एकीकडे गणेशोत्सव २०२१ साजरा करण्याचं सूतोवाच झालेलं, पण काम, मुलांच्या सुट्ट्या, प्रवास, घरची कामं, डच भाषेच्या परीक्षा - एक ना दोन, अनेक अडचणी येतच गेल्या. तरीही दिवसागणिक बाप्पाचं आगमन अधिकाधिक जवळ येत आलेलं. नेहमी EMM जसा कार्यक्रम आखतं तसं सगळं सुरु होतं, परंतु म्हणावा तसा जोर चढत नव्हता, प्रतिसाद मिळत नव्हता. वाटलं अपुऱ्या सहभागामुळे या वर्षीचा कार्यक्रम रद्द होतोय की काय.
मागच्या आठवड्यात मिटिंगला आलेले EMM चे कार्यकर्ते (सोनाली, सायली, संकेत, आलोक, रोहन आणि मी) जरासे खट्टू झाले. कोणालाच कसं काही जमत नाहीये? पण कित्येकदा असं होतं ना की जराश्या नाराजगीतूनही एक उभारी येते. शेवटी बाप्पा ना आपला. वर्षभर वाट पाहतोय ना त्याची, मग त्याचं स्वागत जोरदार झालंच पाहिजे ना! आपल्या सगळ्या अडीअडचणीना तो येतो धावून, मग त्याचं स्वागत थंडपणे करायचं? छे. ते शक्यंच नाही.
मग काय फोना-फोनी, हॉल शोधण्याची धावपळ पुन्हा एकदा सुरु. आणि वेगळ्या स्वरूपाचा कार्यक्रम एकदम आखला. तरीही उरलेल्या तुटपुंज्या वेळातही यंदा काहीतरी मुलांसाठी खास करुयात ह्या विचाराने जोर धरला आणि मग सुचली - आयडियाची कल्पना! "पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवायची कार्यशाळा"! पण शिकवणार कोण?अमोल निळेकर ह्याने ती अवघड जबाबदारी स्वीकारली. शिवधनुष्यच म्हणा ना! आपण कुठे डे केयर चालवतो जिथे मुलांना एकदा सोडलं की झालं, पाहतील ते कसं रामवायचं १०-१२ मुलांना. पण त्याला मुखत्वे लागते ती आवड. मग पुढचे प्रश्न - करायचे कुठे? 'मिरहोवन' च्या कार्यकर्त्यांनी सांगितलं, आमच्या जवळच्या शाळेच्या पटांगणात करूयात. पोस्टर करायची जबाबदारी गौरी पितळे नी आनंदाने घेतली आणि अक्षरशः अवघ्या काही तासात कार्यशाळा 'सोल्ड आऊट'!
केवळ महाराष्ट्रीयच नव्हे तर गुजराथी, उत्तरप्रदेशी, मध्यप्रदेशी पालकांनीही आवर्जून आपल्या मुलांना सहभागी केलं आणि काय मजा केली मुलांनी सांगू? त्यांचा उत्साह ओसंडून वाहताना पाहून ऊर भरून आलं. अमोलने तब्बल अडीच तास मुलांना अतिशय खुबीने गुंतवून त्यांच्याकडून सुबक मूर्ती घडवून घेतल्या. स्वप्नालीने आपल्या कॅमेराने ते सगळं टिपलंय. एवढ्या उकाड्यात मन लावून एका ध्येयापाठी वेडे झालेल्या छोट्या मूर्तिकारांनाच काय तर उपस्थित असणाऱ्या सर्वांना श्रुतीने आइस्क्रीमही दिलं. खरंच काही काही दिवसच असे येतात की सगळं जमून येतं.
उत्साहाने उत्साह वाढतो म्हणतात ते खोटं नाही. शेवटी आपल्या पुढच्या पिढीला आपला सांस्कृतिक वारसा देण्याची जबाबदारी आपलीच की. त्या कार्यशाळेच्या वेळी आसपासची डच लोकं टकामका बघत होती. काही तर थांबून गणेशोत्सव नक्की काय असतो तेही खोदून खोदून विचारीत होते. डच लोकांनाही आपल्या बाप्पाचं कुतूहल निर्माण व्हावं ना! असो, केवळ नावनोंदणी करण्याला उशीर झाल्यामुळे म्हणा किंवा सहज निसटून गेल्यामुळे म्हणा या कार्यक्रमात आपल्या मुलांनी काय केलं असतं त्याची एक झलक म्हणून हा विडिओ जरूर पहा आणि आत्ताच खूणगाठ बांधून ठेवूया की पुढचा कोणताही कार्यक्रम असो त्यासाठी आपला सहभाग वेळेतच पूर्ण करून आपल्या मुलांच्या सांस्कृतिक जडणघडणीसाठी जागरूक राहूया.
Comentarios